
परिस्थिति अत्यंत गंभीर होती. दहा - बारा शेळयांना जुलाब लागले होते. जुलाबाने त्यांचे पाठ पोट एक झाले होते.
लागवडीचा बोकड अत्यंत उमदा. पण त्याच्या बरगड्या दिसत होत्या. चाल मंदावली होती. रुबाब मावळला होता. मी स्वतावर अत्यंत नाखुष झालो. पण सावरलो. जुलाब होणार्या सगळ्या शेळयांना enrofloxacion हे तोंडाने पाजावायचे औषध दिले. पण फरक पडेना. डॉक्टर शिंदेंशी चर्चा केली. तर ते म्हणाले ते औषध देत रहा एक दोन दिवसात फरक पडेल. काही शेळयांचे जुलाब थांबले. पण बोकड आणि आणखी एक दोन शेळयांचे जुलाब थांबेनात. बोकड तर पार अर्धमेला झाला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महासंघाचे संचालक डॉक्टर सचिन टेकडे यांना फोन केला. त्यांनी डिवॉर्मिंगचे औषध द्यायला संगितले. ते औषध नव्हतं माझ्याकडे. घेऊन आलो. तेही औषध दिलं. पण कमी होण्या ऐवजी जुलाब वाढलेच. परत डॉक्टर मनोज शिंदेंना फोन केला. ते म्हणाले , " होतील कमी. डिवॉर्मिंगच औषध दिल्यानंतर दोन दिवस जरा जास्तच जुलाब होतात. "
पण मी समाधानी नव्हतो. मला लवकरात लवकर रिकव्हरी हवी होती. पुन्हा माझ्या पाहुण्यांना फोन केला. ते म्हणाले , " सल्फा बोलस देऊन पहा. " आणली सल्फा बोलस. दिली. आणि दुसऱ्या दिवशी पहाट उजाडावी तसं झालं. सगळ्यांचे जुलाब थांबलेले.
पण शेळ्या अशा आणि एवढ्या प्रमाणात का आजारी पडल्या त्याचं मुळ शोधणं गरजेचं होतं. ते शोधणं डॉक्टरांचं काम नव्हतं. शेड तर मी पाण्यानं होतं. फिनाईल फवारलं होतं. निर्जंतुकीकरण केलं होतंमग चुकलं होतं कुठे ? आणि चुकलं होतं काय ?
मी पाडव्यानंतर बुधवारी गावी पोहचलो. आजारी शेळ्यांना इंजेक्शन देऊन शांत डोक्याने शेडचं निरीक्षण केलं. पाहिली तर शेड धुतल्यानंतर पाणी वाहून जाण्यासाठी जी नाळ होती तिच्यात अनेक ठिकाणी पाणी साठलं होतं. त्या पाण्यात शेळ्यांचा लेंड्या आणि मूत्रही होतं. त्या सगळ्याचा एक अत्यंत घाणेरडा वास येत होता.
मी शेड एकदाच झाडून घ्यायचो.
त्यानंतर आम्ही रोज दोन वेळा शेड झाडतो. खूप स्वच्छता ठेवतो. त्यामुळे आता बराच फरक पडलाय. गेल्या पंधरा दिवसात मी अवघ्या तीन - चार शेळ्यांना इंजेक्शन दिलंय. अन्यथा रोज तीन - चार शेळ्यांना इंजेक्शन देणं हा आमचा परिपाठ होता. प्रत्येक वेळी स्वच्छतेचं महत्व मोदींनीच सांगायला हवं का ?
डॉक्टर सचिन टेकाडे यांचा ब्लॉगही पाहिला. शेळ्यांच्या अनेक आजारावर स्वच्छता हा त्यांनी रामबाण उपाय सांगितलं आहे.
आता सगळ्याच शेळ्यांची तब्येत सुधारली आहे. लागवडीचा बोकड डौलात आणि त्याच्या मूळ रुबाबात चालतो आहे. मी खुष आहे. नाही नाही म्हणता माझी गाडी रुळावर येते आहे.

No comments:
Post a Comment