Thursday 11 May 2017

यशांतर काय ....?


' अपयशा नंतर यशाची पायरी असते. ' हे सुभाषित लहानपणी शाळेच्या भिंतीवर वाचलं होतं. निबंध लेखन करताना ते अनेकदा वापरलं होतं. पुढे अनेक विचारवंतांच्या कथानात हे सुभाषित ऐकलं होतं. पण यशानंतर काय ?
यावर कुणी विचार मंथन केल्याचं माझ्या ऐकिवात नाही. मीही त्याचा कधी विचार केला नव्हता. पण माणूस चढण चढणार. शिखरावर पोहचणार. काही काळ तिथं दिमाखात घालवणार. पण कधीतरी त्या शिखरावरून त्याला पाय उतार व्हावच लागणार. या धगधगत्या वास्तवाचा अनुभव मी नुकताच घेतला. पाय मोडलेल्या शेळीला उभं करण्याची उमेद देणं याला मी माझ्या यशाचं शिखर मानत होतो.

मी शेळी पालन सुरू केलं. एक यशस्वी शेळी पालक व्हायचं. काहीतरी भव्यदिव्य करायचं हे ध्येय. पण पहिल्या महिन्याभरातच अनेक अडचणी आल्या. मी प्रत्येक अडचणीला तोंड देत गेलो. माझ्या शेळीचा पाय मोडला आणि त्यावर मी कशा प्रकारे मात केली या विषयी मी माझ्या ' आणि माझी शेळी उभी राहिली ' या मागील पोस्ट मध्ये लिहिलं होतं.

पण पुण्याहून गावाकडे परतलो तर त्या शेळीची तब्येत बिघडली होती. तिचे पुढचे दोन्ही पाय प्रचंड सुजले होते, सुजून जाणत्या माणसाच्या मनगटा एवढे झाले होते. वेदनांमुळे ती भेसूर ओरडत होती. माझ्या काळजाला घरं पडत होती. तिचं खाणं पीणं अत्यंत कमी झालं होतं. मला चिंता वाटली. तिला उभं करन मुळीच शक्य नव्हतं. मी त्या शेळीला उभी करीन. तीन पायांवर का असेना तिला चालायला शिकवीन हा माझा विश्वास डळमळीत झाल्यासारखं वाटत होतं. पण मी हार मानणार्‍यातला नव्हतो. त्या शेळीनं जगण्याची उमेद सोडली असेल तरी मी उमेद सोडणारा नव्हतो.

मी डॉक्टरांना बोलावून घेतलं. त्यांनी तिला पेणकिलरचं इंजेक्शन दिलं. त्या रात्री ती फार ओरडली नाही. सकाळी उठलो तर जरा बरी वाटली. पण चार्‍याला शिवत नव्हती. मी स्वस्थ बसणारा नव्हतो. मी रोज सकाळी आणि रात्री दोन दोन तास तिच्या जवळ बसू लागलो.आपण लहान मुलाच्या तोंडात दूध भाताचा घास भरवतो तसा मेथी घासाच्या चार चार काड्यांचा घास करून तिच्या तोंडात भरवू लागलो. तीही कुकुलं बाळ होऊन माझ्या हातून भरवून घेवू लागली. नकोसं वाटलं की लहान मुलासारखी माझ्या मांडीवर मान टाकू लागली. अशी मी तिची अखंड सेवा करत होतो. त्या सेवेला यश येतं आहे असं वाटत होतं. आता ती पुन्हा आपलं आपण खाऊ पिऊ लागली.

कित्येकदा मी तिच्याशी बोलायचो. म्हणायचो , " तुला बरं व्हायचय राजा. तीन पायावर का होईना चालायचं आहे. दोन दोन नव्हे तर एकाच वेळी तीनतीन  चारचार पिल्लं देवून त्यांची आई व्हायचं आहे. त्या चार चार पिल्लांना मागे पुढे घेवून फिरायचं आहे." तिला माझं बोलणं कळतं असावं अशा तोर्‍यात ती डोळ्यांची उघडझाप करायची. आणि डोळे मिटून मान माझ्या मांडीवर टेकायची.

चार दिवस गेले आणि पुन्हा तिनं खाणं पीणं कमी केलं. तिचं भेसूर ओरडणं सुरू झालं. डॉक्टरांना बोलावलं. त्यांनी इंजेक्शन दिलं. पण म्हणाले , " ती जगेल याची तीळमात्रही खात्री नाही. "

त्यानंतरही तिच्या तब्येतीत चढ उतार होत होते. मी दोन चार दिवसातून शेणा मुतात भिजलेला तिचा पार्श्वभाग धुवून काढायचो. पण त्या दिवशी का कुणास ठाऊक मी तिला संपूर्ण अंघोळ घालायचं ठरवलं. दहा वाजेपर्यंत इतर शेळयांच खाणं पीणं उरकून तिच्याकडे वळलो. तिला शेडच्या बाहेर घेतलं. दोरीच्या साह्याने उभं केलं. तिला डोक्यावरुन पाणी घालून संपूर्ण अंघोळ घातली. तिचं अंग सुकावं म्हणून तिला शेडच्या बाहेर उन्हातच ठेवलं. नेहमीच शेडमध्ये सावलीत पडून राहणार्‍या तिला उन्हात बरं वाटेल असाही हेतु मनात होता.

तिला अंघोळ घालून काही कामानिमित्त मी गावात गेलो. दोन अडीच वाजता माझ्या गड्याचा फोन आला. म्हणाला ," काकाजी आपली शेळी गेली. "

मी काही क्षण सुन्न झालो. तसाच सरकारी दवाखान्यात गेलो. तिथले डॉक्टर गुंजाळ हेही सद्गृहस्थ. म्हणाले , " शेळी इकडे आणलीत तर बरं होईल. लगेच पोस्ट मोर्ट्म करून देतो."

मी शेळी माझ्या गाडीत घातली. सरकारी दवाखान्यात गेलो. डॉक्टरांनी पोस्ट मोर्ट्म केलं. म्हणाले , " हा अपघात घडला त्याला किती दिवस झाले ? "

" एक महिना. " मी.

" बापरे ! तुम्ही ही शेळी एक महिना कशी जगवलीत हाच फार मोठा प्रश्न आहे ? कारण दुसर्‍या शेळीनं धडक मारल्यानंतर तिचा नुसता पाय मोडला नव्हता तर तिचं लिव्हरही पंक्चर झालं होतं. हा पहा पंक्चर लिव्हर मधून तिच्या पोटात त्वचेखाली पसरलेला मैला." असं म्हणत डॉक्टरांनी मला तिच्या फाडलेल्या त्वचेच्या पहिल्या पदराखाली पसरलेला चावलेल्या चार्‍याचा चोथा दाखवला. वर म्हणाले , " लिव्हर पंक्चर झालेलं जनावर आठ दिवसापेक्षा अधिक जगू शकत नाही."

ते सारं पहिल्या नंतर मला थोडं बरं वाटलं. म्हणजे माझी एक शेळी मरण पवल्याच दुखं होतच पण माझे प्रयत्न कमी पडले नव्हते याचा आनंद वाटत होता. तिच्या आयुष्याची दोरीच तेवढी होती.

हे सार घडलं आणि यशानंतर काय हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. आणि नंतर माझ्या विचार मंथनातून मला सापडलेलं उत्तर असं - ' यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुम्ही मनात योजाल तसंच नाणं पडेल असं नाही. त्याच्या दोन probability असतात, हेड अथवा टेल. पण या दोनच possibility आहेत. यापेक्षा अधिक नाहीत. असंख्य तर मुळीच नाहीत. त्यामुळेच आपण टॉस करत रहाण्याचं काम करत रहायला हवं. कायमच अपयश पदरी पडेल असं नव्हे. कधीतरी यश नक्कीच मिळणार असतं. नियमित यशाच्या शिखरावर राहण्यासाठी गरज असते उतरण धीरनं उतरण्याची आणि चढण हिंमतीनं चढण्याची.'



        -


No comments:

Post a Comment