Friday 14 April 2017

आणि माझी शेळी उभी राहिली

पाडव्यासाठी पुण्यात आलो. सोमवारी पुण्यात येऊन बुधवारी पुन्हा गावी पोहचलो. अवघा दोन दिवस थांबलो होतो. गावी पोहचल्यावर कपडे न बदलता शेड मध्ये पोहचलो. आणि हबकलो.


परिस्थिती अत्यंत गंभीर होती. अनेक शेळ्या गंभीर आजारी होत्या. एक शेळी माझ्यासमोर कोसळली. प्रयत्न करून आधार देऊनही ती उभी राहीना. दुसरीलाही चक्कर येत होती. तिचे पाय थरथर कापत होते. दहा बारा शेळयांना डिसेंट्री झाली होती. शेळी पालनाच्या भाषेत त्याला बुळकांडणे असेही म्हणतात. किंवा शेळीला हगवण लागली होती असेही म्हणतात.

माझा लागवडीचा भला दांडगा बोकड. पण जुलाबाने पार निस्तेज झाला होता. पोट खपाळी गेले होते. रुबाब मावळला होता. चाल मंदावली होती. एका रुबाबदार नराची पार माती झाली होतो. मला खुप वाईट वाटले. वाटलं हे कसलं आपलं शेळी पालन ? नाही जमणार आपल्याला.

पण ही नाउमेद क्षणभराची. तासाभरात मनावरची मरगळ झटकली. कामाला लागलो. माझ्या आवाक्यातल्या शेळ्यांना इंजक्शन दिलं. ज्या शेळ्या बुळकांडत होत्या त्यांना औषध पाजलं.  ज्या शेळ्यांचा इलाज माझ्या आवाक्यात नाही त्यासाठी डॉक्टरला बोलावलं. त्यांनी माझ्या आवाक्यात नसणाऱ्या दोन्ही शेळ्यांना ट्रिट केलं. पण संध्याकाळपर्यंत दोन्ही शेळ्यांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही. उलट दुपारी जी शेळी नुस्ती थरथर कपात होती रात्री तिनंही अंग टाकलं. तिच्या तोंडातून काहीसा फेस येत होता. डॉक्टरांना जेवत्या ताटावरून उठून या म्हणून सांगितलं. तेही दहा मिनिटात आले. पुन्हा इंजेक्शन.

रात्र गेली. दिवस उजाडला. परिस्थितीत फारसा फरक पडलेला नव्हता. पुन्हा डॉक्टरांना बोलावलं. आणि उभं न राहू शकणाऱ्या शेळीचा पुढचा डावा पाय खुब्यात मोडला आहे हे त्यांच्या लक्षात आलं. शेळ्यांच्या भांडणात ते झालं असावं. पण आता माझ्या दृष्टीने ती शेळी उभी राहील कि नाही हा प्रश्न फार महत्वाचा होता.

माझ्या शेडला नियमित व्हिजिट करणारे डॉक्टर मनोज शिंदे. तरुण हसत मुख. हाकेला धावून येणारे. समोरच्याच्या मनात उमेद जागवणारे. मला म्हणाले ," शेळी नक्की उभी राहील. तिला बजरंगी लेप लावा. "

माझा गडी म्हणाला , " वारुळाची माती आणि तरवडाच्या पाल्याचा लेप लावला तरी चालतो ना. "

डॉक्टर म्हणाले , " हो , हा गावठी उपायसुद्धा करतात अनेकजण. करून पहा. झाला तर फायदाच होईल तोटा होणार नाही. "

दोन तीन दिवस आम्ही हरेक उपाय केले. पण शेळी काही उभी राहीना. व्हेटर्नरी डॉक्टर असणाऱ्या माझ्या एका नातेवाईकांना बोलावलं. तेही चाळीस किलोमीटरवरून आले. ते म्हणाले," हि खुबा मोडलेली शेळी विकून टाका. कसाई घेईल तिला. हजार पाचशे रुपये येतील."



पण मी म्हणालो, " काका हि शेळी उभी राहू शकेल का ? "

ते म्हणाले," हो उभी राहील. पण त्यासाठी तुम्हाला खुप प्रयत्न करायला लागतील. "

मी म्हणालो , " मी हवं ते करीन. पण तिला उभा करीन. ती आयुष्यभर लंगडत चालली तरी हरकत नाही पण मी माझी शेळी कसायाला विकणार नाही. "

त्यांनी सकाळ संध्याकाळ वाळू अथवा वीट गरम करून शेळीला शेक द्यायला सांगितले. त्यांनतर सलग पंधरा दिवस मी तिला शेक दिला. मी शेक देताना मांडी घालून तिच्या पुढ्यात बसायचो आणि ती काहीही न करता डोळे मिटून माझ्या मांडीवर मान ठेवायची.

तिच्या मनात उभं राहण्याची उमेद यावी , कोणत्या पायावर कसं भर द्यावा याचा तिला अंदाज यावा म्हणून तिच्या पोटाखाली दोरीचा आधार देऊन छताला अडकवून मी तिला उभं करायचो. हे डॉक्टरांनी नव्हतं सांगितलं. हे माझं मानसशास्त्र.

याउपर तिला स्वतंत्र ठेवणं. तिला स्वतंत्र चारापाणी देणं. दर तीन - चार दिवसांनी शेणा मुतात असणारा तिचा पार्श्वभाग धुवून काढणं. हे सारं केलं. आणि माझ्या प्रयत्नांना यश आलं. उठण्यापुरता आधार दिल्यानंतर माझी शेळी आधाराविना उभी राहू लागली आहे. चारा पुढे धरला तर चाऱ्यासाठी चार पावलं पुढे टाकू लागली आहे.


   
मला एक गोष्ट कळाली. माणसाला आता प्रेमापेक्षा पैशाची गरज अधिक वाटू लागली आहे. पण खरंतर माणूस काय आणि प्राणी काय प्रत्येकाला गरज असते ती केवळ प्रेमाची आणि मानसिक आधाराची.
  

No comments:

Post a Comment