Tuesday 28 March 2017

माझा शेळी फार्म



मार्च महिन्यात माझं शेळीपालनाच प्रशिक्षण पूर्ण झालं आणि लगेच मी हा ब्लॉग सुरु केला. शेळी पालकांना मार्गदर्शन कराव यापेक्षा अनुभव कथन हा या ब्लॉगचा प्रमुख हेतू. खरंतर जून २०१७ ला माझा प्रोजेक्ट सुरु व्हायला हवा होता. परंतु
बँकेचं लोन होत नव्हतं.

खूप प्रयत्नपूर्वक लोन मिळवलं. सप्टेंबर महिन्यात बॅंकेन लोन मंजूर केलं. त्यानंतर शेडच बांधकाम. ते व्हायला ऑक्टोबर नोव्हेंबर उजाडला.

शेड पूर्ण झालं. चाऱ्याची लागवड झाली होती. दहा गुंठे हत्ती गवत , दहा गुंठे घास , वीस गुंठे कडवळ , सहा गुंठे मका लावला होता. चारा उगवून आला होता. आता केवळ शेळ्या आणायचे बाकी होते.

पण तेवढ्यात निवडणूक आली. माझी सख्खी बहीण पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची निवडणूक लढवणार होती. ती मागील पाच वर्ष नगरसेवक होती. अडीच वर्ष स्थायी समितीवर काम केलं होतं. पालिकेतला राष्ट्रवादीचा भ्रष्टाचार उकरून काढताना तिनं सत्ताधारी राष्ट्रवादीच्या तोंडाला फेस आणला होता. भारतीय जनता पार्टीकडून तिला तिकीट मिळणार हेही निश्चित होतं. निवडणूक जाहीर व्हायच्या आधीच प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली होती.

आमचा सगळा गोतावळा पुण्याबाहेर. गावाकडे. प्रचाराची धुरा व्हायला घरची आम्ही अवघी चार भावंड. माझी मुलं हाताशी आलेली. त्यांचाच काय तो वाढीव हातभार. सहाजिकच गावाकडचा सगळा पसारा तसाच टाकून मी पुण्यात ठाण मांडल. तीन महिने अथक प्रचार केला.

प्रचार संपला. मतदान झालं. मतमोजणी पार पडली आणि विजयाचा आनंद साजरा करून मी दुसर्याच दिवशी गावाकडे परतलो.

पटापटा निर्णय घेतले. एवढा मोठा प्रोजेक्ट चालवणं हे माझ्या सारख्या शहरात राहिलेल्या आणि व्यवसायानं अभियंता असलेल्या गृहस्थाच काम नव्हतं. गडयाची गरज होती. माझ्याकडे पूर्वीच वर्षभर राहून गेलेला गडी या कामासाठी येणार हे मी निवडणुकीच्या प्रचारासाठी पुण्यात जाण्यापूर्वीच निश्चित झालेलं होतं.

प्रचाराच्या दगदगीत असतानाही गड्याच्या संपर्कात होतोच. गावी गेल्यानंतर त्याला फोन केला. तो म्हणाला, " मला न्यायला या."

नादेडला जाऊन त्याला घेऊन आलो. लातूरच्या अशाच एका बंदिस्त फार्मवरून शेळ्या आणायचा निश्चित केलेला होतं. त्या फार्मला आधी एकदा भेटही दिली होती. गड्याला घेऊन आल्यानंतर त्या गृहस्थांशी संपर्क साधला. ९ मार्चला शेळ्या आणण्याचं नक्की झालं.

९ तारखेला पहाटे ४ वाजता निघालो. सोबत माझा गडी , माझा वाटेकरी आणि माझे नातेवाईक असलेले एक व्हेटर्नरी डॉक्टर.

बारा वाजता लातूरच्या फार्मवर पोहोचलो. शेळ्यांची निवड केली. टेम्पो भरला आणि रात्री दहा वाजता शेडवर पोहचलो.

माझी पत्नी , गडयाची बायको पुष्पा तयारीत होत्या. त्यांनी पाच शेळ्यांचं औक्षण केलं. त्यांना हळद कुंकू लावलं. त्यांच्या पायावर पाणी घातलं. आम्ही शेळ्या शेडमध्ये सोडून त्यांना चारा टाकला आणि गोडधोड केलेलं जेवायला बसलो. 
  

No comments:

Post a Comment