Saturday 19 March 2016

शेळी पालन


चार वर्ष झाले मी जॉब सोडला त्याला. एका चांगल्या बहुदेशीय कंपनीतली नौकरी. Production Manager हि पोस्ट. चांगला पाच आकडी पगार. पण तरीही जॉब सोडला. अनेकांनी विरोध केला. मी मात्र ठाम. त्याची फळही भोगली. चार वर्षात चांगले दोन कोरडे ठक्क दुष्काळ पदरी पडले. मोडुन पडलो. पण
पुन्हा उभा राहिलो. अर्धा एकरात भेंडीचं चांगलं लाख भराचं उत्पन्न काढलं. अवघ्या चार महिन्यात.……  शेंडे आळी कशाशी खातात हे माहित नसताना. माझा भेंडीचा प्लॉट इतका जोमदार होता कि आजुबाजुचे लोक माझा भेंडीचा प्लॉट पहायला येऊ लागले. मध्येच अर्धा एकरात केवळ दोन महिन्यात ऐंशी हजाराची मेथी आणि कोथिंबीर घेतली. केवळ दीड महिन्याचं पिक . २०१४ - १५ ला चांगलं सहा एक लाखाचं उत्पन्न पदरी पडलं. पण दुष्काळ पाठ सोडत नव्हता. यावर्षी तर प्यायच्या पाण्याचीही मारामार. तरीही माझा दोन अडीच लाखाचा उस गेलाय. तीन एक लाखाचा कांदा काढणीला आलाय.

चार वर्षात माझ्याकडे अनेक गडी आले आणि गेले. एखादा अपवाद वगळता सगळे मला टोपी घालू पहाणारे. पण आता पुन्हा एक चांगला माणुस मिळालाय. प्रामाणिक, कष्टाळु , हुशार , व्यवहारी.

पण माझ्या पराकाष्ठेला , हिंमतीला मोडु पहाणाऱ्या दुष्काळाचा कणा मला मोडायचा आहे. त्यासाठी काहीतरी आगळं वेगळं करायचं आहे. काय करायचं याचा विचार करता करता शेळी पालन करून पहावं असा विचार मनात आला, आणि त्या व्यवसायाची जमेल तशी कुंडली काढली. यु टूब मध्ये डोकावुन पाहिलं. गुगल उलथं पालथं केलं . काहीतरी सापडतय असं वाटलं. पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर शेळी मेंढी विकास महासंघाची माहिती मिळाली. जाऊन आलो. तिथं शेळी मेंढी पालनाच ट्रेनिग सुध्दा देतात हे कळलं. ट्रेनिगची गरज होतीच. नाव नोंदलं. आणि आज ट्रेनिग पार पडलं. उद्या प्रमाण पत्र पदरी पडेल.

हि माझ्या नव्या व्यवसायाची खऱ्या अर्थानं पायाभरणीची कुदळ. पण पुढची एकेक वीट  रचताना खरा कस लागणार आहे.

पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर शेळी मेंढी विकास महासंघाचे उपसंचालक डॉ. सुनील टेकाडे यांचं मार्गदर्शन. खरंतर ट्रेनिगच्या आधी मला एकानं हे संघाचं ट्रेनिग घेऊ नका. तिथं फारसं काही शिकवत नाहीत असं सांगितलं होतं. पण मी दुर्लक्ष केलं आणि ट्रेनिंग अटेन्ड केलं. आणि मी त्या फुकटचा सल्ला देणाऱ्याच ऐकलं नाही म्हणुन मला मनस्वी आनंद झाला. काही लोकं अशा अफवा ( Rumour ) का पसरवतात कुणास ठाऊक !
( अंडर लाईन केलेला संघ हा शेळी मेंढी विकास महासंघातला संघ बरं का ! नाहीतर नुसतं संघ म्हटलं म्हणुन इतरांना भलतीच शंका यायची. आली तर आली. कारण मला त्याही संघाचं वावडं नाही.)

डॉ. टेकाडेंनी त्यांच्या ओंजळीत जे जे होतं ते ते सारं आमच्या पदरात घातलं. स्वतःकड काही ठेवावं हा या माणसाचा स्वभावच नव्हे . मी त्यांच्या स्वभावाला सागराची उपमा देईन . सतत देत राहणाऱ्या पण कधीही रिकाम्या न होणाऱ्या सागराची उपमा.

मी इथं अपलोड केलेला फोटोही त्यांच्याच गोट फार्मिंग ब्लॉग वरून घेतलेला. त्यांनी नुसतं शिकवलंच असं नव्हे तर सर्वतोपरी पाठीशी रहाण्याचा विश्वास दिला. कदाचित दुसऱ्या कुठल्याच ट्रेनरनं हा विश्वास दिला नसता. विद्या देणारे गुरु अनेक असतात पण विश्वास देणारा ह्जारातून एखादाच.

आता पुढची पावलं टाकताना डॉ. सुनिल टेकाडेंनी दिलेला हा विश्वास सोबत आहे. पुढच्या वाटचालीत जे जे समोर येईल ते सारं तुमच्या समोर मांडणार आहे. त्यात वाटेवर दिसलेली हिरवळ असेल , गर्द सावली असेल , आणि एखाद्या दुसऱ्या पावलाला लागलेली ठेचही असेल.

पण शेळी मेंढी पालनाच्या क्षेत्रात नव्यानं पाऊल  टाकू पाहणाऱ्यांना त्या ठेचा टाळून पुढं जाण्यासाठी या ब्लॉगचा उपयोग होईल हा विश्वास आहे. 

2 comments: